
रायगडचे राजकारण,
पुन्हा एकदा तापू लागले
जनतेच्या प्रश्नांपेक्षा
खुर्च्यांचंच महत्त्व वाढू लागले…
सत्तेच्या बाजारात
नव्या सौद्याची पावती फाडली,
पालकमंत्रिपदाच्या बदल्यात
विधान परिषदेची जागा सोडली…
कोणी म्हणालं, “ही युती आहे…”
कोणी म्हणालं, “ही सेटलमेन्ट आहे…”
पण जनतेला मात्र
राजकीय अदलाबदलच दिसली…
वाटून घेतात आपापले सुभे,
जणू महाराष्ट्र नव्हे
तर
एखादं जहागिरीचं राज्य आहे…
एका हातात पालकमंत्रिपद,
दुसऱ्या हातात विधानपरिषदेची जागा,
आणि मधोमध उभी जनता;
नेहमीसारखीच रिकाम्या हातांनी…
कालपर्यंत केले एकमेकांवर
भ्रष्टाचाराचे आरोप
आज मात्र एकाच टेबलावर
चहाचे घोटआणि सत्तेची गणिते…
विचारधारा? ती निवडणुकीच्या भाषणापुरती…
तत्त्वं? ती पोस्टरवर छापण्यासाठी…
आणि जनतेचं भविष्य? ते पुढच्या निवडणुकीपर्यंत तहकूब…
राजकारण आता
सेवेचं माध्यम राहिलेलं नाही,
तर ‘तुझं मला, माझं तुला’ या व्यवहाराचं
सुसंस्कृत नाव बनलं आहे…
रायगडच्या डोंगरांनीही कदाचित
आज विचारलं असेल,
‘इथे स्वराज्याची शपथ घेतली होती,
की सत्तेच्या सौद्यांची?’
आणि जनता? ती पुन्हा टाळ्या वाजवेल,
घोषणा देईल, मोर्चे काढेल…
कारण प्रत्येक पक्षाला ठाऊक आहे,
स्मरणशक्तीपेक्षा भावना लवकर पेट घेतात.
: मनीष