
दिवा परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलीच्या शोधासाठी मुंब्रा पोलिसांनी अक्षरशः दिवस-रात्र एक करत तब्बल ९४८ सीसी टीव्ही फुटेज तपासून अवघ्या दोन दिवसांत या क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा केला. कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी केलेल्या या तपासाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
२८ मे २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दिवा येथील साक्षी विजयकुमार पांडे (वय ७) ही आपल्या घराजवळील परिसरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि दुसऱ्या दिवशी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील प्रत्येक इमारत, टेरेस, रिकाम्या खोल्या, गटारे, चेंबर यांची कसून तपासणी करण्यात आली. मुलीचा फोटो संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय, रेल्वे पोलीस, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि स्थानिक नेटवर्कवर प्रसारित करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. एकामागून एक फुटेज तपासत असताना साक्षी धनलक्ष्मी अपार्टमेंट, श्लोक नगर, दातीवली रोड परिसरातून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तब्बल ६७ फुटेज तपासल्यानंतर मुलगी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ दिसून आली. मात्र त्यानंतर तिचा माग काढणे अधिक आव्हानात्मक ठरत होते.
दुसऱ्या दिवशी दिवा – आगासन रोड आणि रेल्वे स्थानक परिसरातील फुटेज तपासताना तपास पथकाला महत्त्वाचा धागा मिळाला. साक्षी दिवा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना दिसली. रात्री १०:५७ वाजता दोघेही अंबरनाथ लोकलमध्ये चढल्याचे सीसी टीव्हीमध्ये स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी तातडीने सहा स्वतंत्र पथके तयार करून कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांकडे रवाना केली.

रेल्वे स्थानकांवरील फुटेज तपासत असताना साक्षी आणि तो इसम अंबरनाथ स्टेशनवर उतरल्याचे दिसले. तेथून दोघे बदलापूरकडे रवाना झाले आणि मध्यरात्री बदलापूर स्टेशनवर उतरतानाही सीसी टीव्हीमध्ये कैद झाले. आता तपासाचे केंद्र बदलापूर झाले होते.
बदलापूरमध्ये पोलीस पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. रिक्षाचालक, स्थानिक नागरिक, दुकानदार आणि स्थानिक पोलिसांना संशयिताचा फोटो दाखवून चौकशी सुरू झाली. अखेर एका महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचे नाव सुमित शांताराम जाधव (वय ३५) असल्याचे शोधून काढले.
सुमित जाधवच्या बदलापूर येथील घरी पोलीस पोहोचले तेव्हा साक्षी सुरक्षित अवस्थेत आढळली. त्याच्यासोबत त्याची स्वतःची तीन अल्पवयीन मुलेही होती.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, सुमित आणि त्याची पत्नी दीड वर्षांपासून विभक्त राहत होते. तो आपल्या मुलांची स्वतः काळजी घेत होता. त्याने साक्षीला इजा पोहोचवली नसून तिला आपल्या मुलांसोबत ठेवून तिची देखभाल केल्याचे तपासात समोर आले.
महिला पोलिस अधिकाऱ्यांनी साक्षीला विश्वासात घेऊन संवाद साधला. त्यावेळी तिने घरातील परिस्थितीबाबत धक्कादायक माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, तिला सतत घरकाम करावे लागायचे, लहान बहिणीची जबाबदारी सांभाळावी लागायची, खेळण्यासाठी वेळ मिळत नव्हता आणि अनेकदा मारहाणही होत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. परिसरातील काही नागरिकांनीही अशाच प्रकारची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या ६ पथकांनी सलग दोन दिवस आणि दोन रात्री काम केले. जवळपास ९४८ सिसिस टीव्ही फुटेज तपासण्यात आले. झोप, जेवण यांची पर्वा न करता अधिकारी आणि कर्मचारी मुलीच्या शोधासाठी झटत राहिले.
अखेर साक्षीची सुरक्षित सुटका करण्यात यश आले आणि अपहरणाचा गुन्हा अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आला.
ही केवळ एका मुलीच्या शोधाची कथा नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, पोलिसांची चिकाटी आणि वेळेशी सुरू असलेल्या शर्यतीत मिळालेल्या यशाची एक प्रेरणादायी कहाणी आहे.