विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

वेदना अंतरी ठेवुनी, जनसेवेचा दीप जळतो आहे…

 

“चराग़-ए-दिल को जलाए रखा आँधियों के दरमियाँ,
इसी तरह वो हर किसी की राह रोशन कर गया।”

जीवनात काही प्रसंग असे असतात की ते माणसाला आतून पोखरून टाकतात. आईचं निधन हा त्यापैकीच एक. आई ही केवळ जन्मदात्री नसते; ती माणसाच्या अस्तित्वाची सावली असते, आधारवड असते, प्रत्येक यशामागची नि:शब्द प्रार्थना असते. अशी सावली कायमची दूर गेल्यावर माणूस क्षणभर जगणंच विसरतो. पण काही व्यक्तींच्या आयुष्यात स्वतःच्या दुःखापेक्षाही समाजाचं दुःख मोठं असतं. अशा व्यक्तींच्या रांगेत किरण नाकती हे नाव अत्यंत आदराने घ्यावे लागेल.

पावसाचा प्रत्येक थेंब जसा धरतीची तहान भागवतो, तसंच किरणजींचं प्रत्येक पाऊल एखाद्या अडचणीत सापडलेल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी असतं. मुसळधार पाऊस असो, झाड कोसळून रस्ता बंद झाला असो, एखादी दुर्घटना घडली असो किंवा नागरिक संकटात सापडले असोत; किरणजींची उपस्थिती तिथे हमखास जाणवते. जणू त्यांच्यासाठी वेळ, परिस्थिती, दिवस-रात्र यांना काहीच महत्त्व नाही; महत्त्व आहे ते फक्त माणसाचं आणि माणुसकीचं!

आईच्या निधनाचं दुःख मनात ठेवून त्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं नाही. विरहाचे अश्रू मनात दडवून त्यांनी पुन्हा रस्त्यावर पाऊल ठेवलं. कारण त्यांना माहीत आहे की संकटाला अश्रूंची नव्हे, तर आधाराच्या हाताची गरज असते. स्वतःचं दुःख त्यांनी कधीच समाजावर लादलं नाही; उलट समाजाचं दुःख स्वतःचं मानून त्याला सामोरं जाण्याचं बळ दाखवलं.

आजच्या काळात जनसेवा अनेकदा फलकांवर, सोशल मीडियावर आणि भाषणांमध्ये दिसते. पण काही माणसं अशी असतात, ज्यांची जनसेवा कॅमेऱ्यांपेक्षा नागरिकांच्या आठवणीत जास्त जिवंत असते. किरण नाकती हे त्यापैकीच एक. त्यांच्याकडे कोणतं पद आहे किंवा नाही, यापेक्षा त्यांच्या मनात सेवेचं पद कायम आहे. कारण खरी लोकसेवा मतपेटी, ईव्हीएम मशिनमधून मिळत नाही; ती लोकांच्या विश्वासातून मिळते.

नौपाड्यातील अनेक नागरिकांच्या मनात आजही एक हळवी भावना आहे, असा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून लाभायला हवा होता. काही राजकीय समीकरणांनी आणि षडयंत्रांनी ते स्वप्न अपूर्ण राहिलं. पण पद न मिळाल्याची खंत न बाळगता ते सतत जनसेवेचे कार्यात मग्न आहेत. समाजासाठी काम करण्यासाठी खुर्चीची गरज नसते; गरज असते ती संवेदनशील मनाची, हेच किरणजींनी सिद्ध करून दाखवलं.

काही माणसं पावसासारखी असतात. पाऊस स्वतः ढगांमधील वेदना घेऊन येतो, पण पृथ्वीला जीवन देऊन जातो. किरण नाकतीही तसेच आहेत. अंतःकरणात आईच्या विरहाची वेदना असतानाही ते इतरांच्या आयुष्यात दिलासा, आधार आणि आशेचा प्रकाश देत आहेत.

आजच्या स्वार्थी काळात अशा माणसांकडे पाहिलं की संत तुकारामांचा एक विचार आठवतो, “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा!”

किरण नाकती यांची जनसेवा ही केवळ कामांची यादी नाही; तो माणुसकीचा अखंड तेवत राहिलेला दीप आहे…

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment