विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

दोन रुपयांची नोट… आणि मूड रिफ्रेश

रविवारची सकाळ. बाहेर पाऊस थांबलेला. पाऊस खूप पाऊस पडावा, कोसळावा तो रविवारीच असे वाटत असते. पण आजचा रविवार कोरडाच जाणार, या विचारात मूड काहीसा ऑफ होता. चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून पावसाची वाट पाहत होतो. जाणवलं, काही दिवस असे असतात की ते आपल्याला बाहेर फिरू देत नाहीत; ते आपल्याला स्वतच्या आत फिरायला भाग पाडतात.

मूड रिफ्रेश करण्यासाठी मी कपाटाचा ड्रॉवर उघडला. ड्रॉवर म्हणजे जुन्या आठवणींचे एक संग्रहालयच असते. प्रत्येक कोपऱ्यात एखादा ऋतू, जीर्ण डायरीच्या प्रत्येक कागदात एखादा आठवणीतला चेहरा आणि प्रत्येक वस्तूत एक काळ लपलेला! जुन्या शुभेच्छापत्रांचा वास, फिकट झालेली छायाचित्रं, शाई संपलेली पेनं… आणि त्यातच एका जुन्या वहीच्या पानांमध्ये शांतपणे विसावलेली एक दोन रुपयांची नोट समोर आली. ती नोट हातात धरून मी क्षणभर स्तब्ध झालो… एक काळ समोर आला.

आजच्या पिढीला कदाचित दोन रुपयांची नोट संग्रहालयात पाहायला मिळेल; पण माझ्यासाठी ती रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. त्या कागदाला किंमत दोन रुपयांची होती; पण तिचं मूल्य मात्र आजही मोजता येणार नाही. ती नोट पाहताच कॉलेजचे दिवस डोळ्यांसमोर उभे राहिले.

आई रोज कॉलेजला निघताना माझ्या हातावर दोन रुपयांची नोट ठेवायची. त्याकाळातले दोन रुपये म्हणजे आजचे दोनशे रुपये. त्या दोन रुपयांत तिची माया होती, विश्वास होता आणि न बोलता केलेली काळजी होती. घरची परिस्थिती श्रीमंतीची नव्हती; पण प्रेम मात्र भरभरून होतं. त्यामुळे खात्या-पित्या घरचा होतो. वडिलांचा पगार तुटपुंजा. पण त्यातही मुलांना त्याची झळ बसू न देता तीन तीन मुलांचं संगोपन त्यांनी केलं आणि यात त्यांना साथ होती अर्थातच आमच्या माऊलीची.

माझ्यासारखीच परिस्थिती माझ्या मित्रांच्या घरची. त्यामुळे आईने दिलेल्या त्या दोन रुपयांत दिवसाचा सगळा हिशेब बसायचा. कधी कँटीनमधला चहा, कधी एखादा वडा, तर कधी काँट्रीब्युशन काढून मित्रांसोबत आठजणांमध्ये खालेल्ली एक मिसळ-आठ पाव.

त्या काळात खर्च कमी होता म्हणून आनंद मोठा होता की आनंद मोठा होता म्हणून खर्च कमी वाटायचा, हे आजही समजलेलं नाही.

आमचा ग्रुपही आगळाच. आजच्या भाषेत त्याला `गँग’ म्हणतील; पण आमच्यासाठी तो एक छोटा परिवार होता. कॉलेज म्हणजे फक्त शिक्षणाची संस्था नव्हती; ती आयुष्य शिकवणारी कार्यशाळा होती.

लेक्चर बुडवून कँटीनमध्ये तासन्तास रंगलेल्या गप्पा, पावसात भिजत केलेले उपवन-येऊरचे फेरफटके, वर्षभर उंदाडक्या करून परीक्षेच्या आदल्या रात्रीची धावपळ आणि निकालाच्या दिवशी धडधडणारं हृदय… हे सगळं त्या दोन रुपयांच्या नोटेशी नकळत जोडलेलं होतं.

आज विचार करतो, त्या काळात आमच्याकडे काय नव्हतं? तर मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हतं. सेल्फी नव्हते. पण वेळ होता. मैत्री होती. एकमेकांना ऐकून घेण्याची सवड होती आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षण जगण्याची कला होती…

आज मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत; पण अचानक भेटून खांद्यावर हात ठेवणारे मित्र दुर्मिळ झालेत. आज प्रत्येकाकडे अमर्याद डेटा आहे; पण निवांत गप्पांसाठी वेळ उरलेला नाही. आज पैशांची संख्या वाढली; पण समाधानाचं गणित कुठेतरी चुकलं.

काळाने खूप काही दिलं-शिकवलं. जबाबदाऱ्या, अनुभव, यश-अपयश, परिपक्वता… पण त्याबदल्यात त्याने काही गोष्टी अलगद परतही घेतल्या. निरागसपणा, निष्पाप मैत्री, रोज दोन रुपये हातावर ठेवणारी आई आणि `उद्याची चिंता करू नकोस, भरपूर शिक’ म्हणणारे वडील!
ती दोन रुपयांची नोट मी पुन्हा वहीत ठेवली. काही गोष्टी खर्च करून संपत नाहीत. कारण आठवणींच्या एफडीचं व्याज बँकेपेक्षा जास्त असतं. वर्षानुवर्षांनी ते वाढतच जातं.

खिडकीतून बाहेर पाहिलं. पाऊस नव्हताच. तरीही वर्षानुवर्षे तो आहे तसाच आहे, आकाशात… तो अजिबात बदलला नाही; बदललो ते आपण. तेव्हा पावसात भिजण्याची हौस असायची, आज आठवणींत भिजण्याची…

आज कधी कधी वाटतं, आपल्या आयुष्यातली सर्वात श्रीमंत वेळ म्हणजे जेव्हा खिशात दोन रुपयांची नोट आणि मनात संपूर्ण जग जिंकण्याची स्वप्नं; ती वेळ!

: मनीष

 

Leave a Comment