
सप्टेंबर नेहमीच थोडा वेगळा वाटतो. पावसाळा अजून पूर्ण संपलेला नसतो आणि उन्हाळ्याची चाहूलही लागलेली नसते. हवेत ओलावा असतो, झाडांच्या पानांवर हिरवेपणाचा तजेला असतो आणि खिडकीबाहेरचं जग जणू एखाद्या नव्या ऋतूची चाहूल देत असतं. आणि महत्वाचे म्हणजे सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना!
माझ्या खिडकीत मे – एप्रिलमध्ये फुलपाखरांची ये-जा सुरु होते. कारण खिडकीतला कढीपत्ता सदैव बहरलेला. यंदा मात्र त्यांची चाहूल ऑगस्टच्या अखेरीसच लागली. खिडकीतून बाहेर पाहिलं की एखादं फुलपाखरू क्षणभर येऊन थांबायचं, पंख हलवायचं आणि पुन्हा कुठल्यातरी अदृश्य दिशेने निघून जायचं. हळूहळू फुलपाखरांची ये-जा वाढू लागली आणि माझ्या खिडकीलाही जणू त्यांच्या छोट्याशा जगाचा पत्ता मिळाला.
नाजूक हिरव्या पानांनी भरलेली कढीपत्त्याची फांदी वाऱ्यावर हलत होती. स्वयंपाकघरासाठी असलेलं ते साधंसं झाड अचानक माझ्या खिडकीच्या विश्वातलं महत्त्वाचं पात्र बनलं. आणि मग एक दिवस… पानांमध्ये काहीतरी वेगळं दिसलं. लहान लहान अळ्या! क्षणभर त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्या कढीपत्त्याच्या पानांवर निवांत फिरत होत्या. काही पाने खात होत्या, काही स्थिर होत्या. मला त्या अळ्यांमध्ये उद्याची फुलपाखरं दिसू लागली.
काही दिवसांनी फांदीवर कोष दिसू लागले. बाहेरून पाहिलं तर काहीच घडत नाही असं वाटायचं. पण त्या शांततेच्या आत किती मोठी उलथापालथ सुरू असेल? एक जीव नव्याने जन्म घेत असेल. किती विलक्षण आहे ना!
आपल्याला बदल दिसतो तो फक्त शेवटचा, पंख फुटलेला. उडण्यास तयार असलेला. पण त्याआधीची सारी प्रक्रिया अंधारात घडते. एकटेपणात घडते. शांततेत घडते.
कदाचित म्हणूनच फुलपाखरं नेहमीच माणसांसारखी वाटतात. काही माणसंही अशीच असतात. काही काळ स्वतःमध्ये गुंडाळून घेतात. जगाला वाटतं, हा थांबला आहे. काही करत नाही. कुठेच जात नाही. पण आतमध्ये मात्र एक नवा माणूस जन्म घेत असतो.
आज सकाळी नेहमीप्रमाणे खिडकी उघडली. समोरचं दृश्य पाहून क्षणभर थांबलो. तीन कोष रिकामे होते. रात्री किंवा पहाटेच्या अंधारात कधीतरी त्यांच्यातून फुलपाखरं बाहेर आली असावीत. त्यांनी पंख पसरले असतील, खिडकीच्या ग्रीलमधून बाहेरचा रस्ता शोधला असेल आणि पला प्रवास सुरू केला असेल.
त्यांना निरोप देण्यासाठी मी तिथे नव्हतो. त्यांनी माझी वाटही पाहिली नाही. ज्यांच्या जन्माचा साक्षीदार होण्याची मला उत्सुकता होती, ते माझ्या नकळतच उडून गेले होते. पण एक फुलपाखरू अजून होतं. ते कोषातून नुकतंच बाहेर आलेलं होतं. पंख ओलसर होते. ते उडण्याच्या तयारीत होतं.
मी बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिलो. त्याला घाई नव्हती. कदाचित पहिल्या उड्डाणाआधी प्रत्येक फुलपाखरू क्षणभर स्वतःला विचारत असेल, ‘आता कुठे जायचं?’ आणि मग पंख त्याचं उत्तर देत असतील.
खिडकीबाहेर जग तसंच होतं. झाडं, पाऊस, वारा, आकाश… पण माझ्यासाठी त्या सकाळी काहीतरी बदललं होतं. कालपर्यंत ती खिडकी बाहेरचं जग दाखवत होती. आज ती मला जन्म, प्रतीक्षा, बदल आणि सुटका यांच्यातला एक छोटासा धडा शिकवत होती.
आपण आयुष्यात कितीतरी गोष्टींची वाट पाहत असतो. एखादी भेट, एखादी बातमी, एखादं यश, एखादा बदल… आणि अनेकदा आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो, ते आपल्या डोळ्यांसमोर घडतही असतं, फक्त आपल्या लक्षात येत नाही.
तीन फुलपाखरं उडून गेलेली. मी त्यांना पाहू शकलो नाही. पण त्यांच्या रिकाम्या कोषांनी मला एक गोष्ट सांगितली, प्रत्येक उड्डाणाला साक्षीदाराची गरज नसते. काही उड्डाणं फक्त उडण्यासाठी असतात… आणि काही… आपल्या खिडकीतून सुरू होऊन आपल्या मनात कायमची घरं करून जातात.
अर्धा सप्टेंबर अजून बाकी आहे, कढीपत्ता अजून हिरवा आहे आणि कुठेतरी एखाद्या पानामागे, एखादा छोटासा जीव पुन्हा एकदा आपल्या पंखांची स्वप्नं पाहत असणार आहे.
म्हणूनच सप्टेंबर हा फक्त फुलपाखरांचा महिना नाही तर पुन्हा एकदा उडण्यावर विश्वास ठेवण्याचा महिना आहे…
: मनीष चंद्रशेखर वाघ