
मराठी साहित्यातील अनमोल रत्न, निसर्गकवी ना. धो. महानोर यांची आज जयंती. निसर्गकवी ना. धो. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडे येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील शेतमजूर होते. दुसऱ्याच्या शेतात जाऊन ते राबत असत. ना. धो. महानोरांना चार भाऊ व तीन बहिणी होत्या. त्यात ते सर्वांत थोरले होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले; मात्र माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना शेंदुर्णीच्या शाळेत जावे लागले. शेंदुर्णीची शाळा गावापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर होती. दहा-बारा किलोमीटर पायी चालत जाऊन ते शाळेत जात. शाळेत असतानाच त्यांना कवितेची गोडी लागली.
शाळेत असतानाच ते कविता करू लागले. लहानपणापासूनच त्यांना शेत, शिवार आणि निसर्ग यांची आवड होती. त्यामुळे ते त्यावरच कविता करत. लहानपणी लागलेली कवितेची गोडी पुढेही कायम राहिली.
मॅट्रिक पास झाल्यावर ते जळगावला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी मुळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. तिथे त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्यांच्यात असलेली काव्यप्रतिभा ओळखून महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. दुर्दैवाने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना उच्च शिक्षण अर्ध्यावर सोडून घरी परतावे लागले. घरी आल्यावर ते शेतीत रमले. शेतशिवारात राबतच त्यांनी आपल्या कविता करायला सुरुवात केली. शिक्षण थांबले, पण कविता थांबली नाही.
ते शेतशिवारात रमून कविता करू लागले. शेतशिवारात रमणाऱ्या या कवीने आपल्या कवितेतून निसर्गाची अमाप उधळण केली. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावले. रानात राहणाऱ्या ना. धो. महानोर सरांच्या कवितेचे केंद्रस्थान निसर्ग आणि स्त्रिया होते. निसर्ग आणि स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेल्या कविता वाचकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या.
त्यांचे एकूण अकरा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून ‘अजिंठा’ नावाचे खंडकाव्यही प्रकाशित झाले आहे. यादरम्यान त्यांनी गद्यलेखनही सुरू ठेवले. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथासंग्रह, ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’, ‘आनंदयोगी पु. ल.’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी जरी गद्यलेखन विपुल प्रमाणात केले असले, तरी त्यांचे पहिले प्रेम कवितेवरच होते.
त्यांनी अनेक चित्रपटांची गाणीही लिहिली आहेत. ‘जैत रे जैत’ चित्रपटातील त्यांची गाणी तर रसिकांच्या ओठांवर आजही कायम आहेत. ना. धो. महानोर सर सहा वर्षे विधानपरिषदेचे सदस्य होते. या काळात त्यांनी सभागृहात शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्न पोटतिडकीने मांडले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला.
महानोर सरांना अनेक पुरस्कार मिळाले. अगदी पद्मश्रीदेखील मिळाली; मात्र ‘निसर्गकवी’ ही रसिकांनी, वाचकांनी त्यांना दिलेली उपाधी ते सर्व पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ मानत. ३ ऑगस्ट २०२३ रोजी निसर्गात रमणारा हा निसर्गकवी सर्वांना सोडून गेला. ना. धो. महानोर सर जरी कायमचे निघून गेले असले, तरी रसिकांच्या आणि वाचकांच्या मनात ते कायम निसर्गकवी म्हणूनच स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी आपल्या कवितेतून मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
निसर्गकवी ना. धो. महानोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
: श्याम ठाणेदार
दौंड, जिल्हा-पुणे