ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा

आज शाळेचा पहिला दिवस… हा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा असतो.. काहींचे पहिले पाऊल तर कोणाची नवी शाळा… नवी इयत्ता.. नवी तुकडी.. नवे शिक्षक.. जुनेच पण नव्याने भेटलेले मित्रमैत्रिणी… त्यांच्यासाठी आजचा दिवसही खास ठरला तो खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष स्वागतामुळे. ठाणे महापालिका शाळांमधील आजचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देणारा ठरला.

खासदार नरेश म्हस्के यांनी किसन नगरमधील ठामपा शाळा क्रमांक २३ शाळेतील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले.
आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जशी उत्साहात झाली तसाच प्रत्येक दिवस हा उत्साहात शिका व आपल्या आईवडिलांचे, शाळेचे नाव मोठे करा, शिक्षकांचा आदर राखा, अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, योगेश जानकर, संध्या मोरे, शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहेत्रे, गट अधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते. त्यानंतर, खासदार नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका येथील ठामपा शाळा क्रमांक ०७ येथेही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, योगेश जानकर उपस्थित होते.

आमदार संजय केळकर यांनी आझादनगरमधील ठामपा शाळा क्रमांक ५५मध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवेशोत्सव साजरा केला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वर्तक नगर येथील ठामपा शाळा क्रमांक ४४ येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी संवाद साधला तसेच नवीन पुस्तकांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाचा राज्य शासनाच्या प्रवेशोत्सव उपक्रमाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थांना पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रवेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले तसेच शिक्षक आणि पालक यांचेही अभिनंदन केले.

Leave a Comment