विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

मंत्र वारीचा

मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव…
शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा पीस।
पंढरीच्या वाटेवरती घामाचे मोती चमकती…
नामाच्या गजरात उरते भक्तीची अमोल रत्ने।
वाऱ्याच्या तालावरती फडकते झेंडा साक्षीला…
तुकोबाच्या ओवीतून मुक्तीचा अर्थ उमलतो।

बाहेर भुरभुरणारा पाऊस मनात कुठेतरी हुरहूर माजवत होता म्हणूनच असेल कदाचित वारीची ओढ लागलेल्या माझ्या लेखणीतून हे शब्द उमटले. खरोखरच भक्ताचे भाव पावसाच्या सरींसारखे बरसतात तिथे जिथे तेथे आनंद आहे, वेदना आहे आणि विठ्ठल भेटीचा अनंत सोहळा आहे अशा त्या वारीची ओढ मनाला लागली तर नवल ते काय? कस आहे ना की समर्पणाचा अंतिम क्षण पंढरीच्या वारीत आपले देहभान हरवते. तेथे केवळ भक्ती आणि आत्मशोध उरतो आणि उरते ती अव्यक्त वेदना आणि निर्मळ समाधान आहे. वेदनेची शाश्वत लहर आहे ती किंवा सहजतेचा नितळ प्रवाह म्हणा हवतर. वारी म्हणजे नक्की काय? तर वारी म्हणजे अखंड प्रवास, अखंड भक्ती आणि अखंड प्रेम की जे असते विश्वाच्या अस्तित्वाच्या उत्सवावर, वारी असते सतत वाहणाऱ्या भक्तिरसाचा शाश्वत सोहळा अखंड अविरत सुदाम्याच्या पोह्यांसारखा आयुष्यभर पुरणारा. वारी असते ती गोंदण वाट की जी आत्म्याची ओढ देहाच्या साजावर विसंबून, भक्ताच्या अंतःकरणात उमटणारी विठ्ठल भेटीची आस. वारी असते आत्मशोधाची अशी वारकऱ्यांचा देह चालतो, पण ओढ आत उरते ती केवळ विठ्ठल भेटीची. वारकऱ्याचे पाऊले भक्तिरसात नाहून निघते. ती वाऱ्यावर हलती ओढ अंतरीचा तो साज, विसरतो देहभान. विठ्ठल नामाच्या सुरात ओठ अलवार होतात आणि धुक्यात हरवते वारी मग आभाळ ही भरून येते आणि भिजलेल्या मनाने भक्ती रस्तोरस्ती सांडते. अगदी खरं सांगायचं, तर वारी ही केवळ चाल नाही, ती अंतःकरणाची भाषा आहे.

विठ्ठल नामाच्या संगतीच्या आर्त जपात, हरवत चालणारा ती भक्ती ओढ, समर्पण आणि अनंत शरणागत या वाटेवर मिळणारा शुद्धतेचा साक्षात्कार असतो. वारी असतो एका प्रवासाचा मंत्र किंवा उषःकालच्या धूसर प्रकाशात पंढरीच्या दिशेने वाहणारा ओघ. हे चालणारे पाय केवळ पंढरीच्या वाटेवरून जात नाहीत, तर आपल्या मनाच्या गाभ्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांमध्येही उजेडाचा साक्षात्कार घडवतात. धुळकट रस्त्यावर उमटणाऱ्या पाऊलखुणा म्हणजे श्रद्धेचा ठसा असतो. प्रत्येक पाऊल पुढे पडते ते एका वेगळ्या विश्वाच्या शोधात पडत. ओव्यांनी भारलेला हा प्रवास थकवा विसरायला लावतो आणि अंतरी भाव दाटतो तो विठुरायाच्या भेटीच्या आर्ततेचा आणि मग शब्दांच्या मागे धावणारे मन एका अनाम प्रेमाच्या झंझावातात गुंतून जाते.

त्या निळ्या आकाशाखाली वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या ठेक्यात कधीतरी कराल काळही हरवतो. आवाजांची लय, चालण्याचा ताल आणि हृदयाच्या स्पंदनांची एकसंध लहर, हीच खरी मुक्ती आहे याची पदोपदी जाणीव होते.

हा प्रवास आहे अंत:करणाचा, जिथे जन्म मृत्युच्या सीमा देखील लोप पावतात आणि उरतो तो फक्त विठू नामाचा गजर.वारी म्हणजे केवळ चालणारा प्रवास नव्हे, तर आत्म्याचे शुद्धीकरण आणि ब्रह्मतत्त्वाच्या अनुभूतीचा मार्ग आहे. संत ज्ञानेश्वरांनी या वाटेवर अद्वैताची अनुभूती दिली, जिथे देहाचे अस्तित्व विसरून आत्मा विश्वात विलीन होतो.धिटुकली मुक्ताई भक्तीचा स्वर स्वच्छंदतेने गोंधळत मुक्ततेचा मंत्र जपून गेली तर अशा या भावंडांचा वारकरी समुदायाशी असलेला नातेसंबंध हा केवळ श्रद्धेचा नव्हता, तर अंत:करणाच्या विलीनतेचा होता. जनाबाईंनी तर नामस्मरणाला कर्मयोगाचा स्पर्श दिला. त्यांच्या सेवेतील प्रत्येक स्पंदन हे ईश्वराशी संवाद होता, जिथे अहंकार लोप पावतो आणि भक्ती आत्म्याच्या स्वरूपात प्रकटते. तर तुकाराम महाराजांनी नामाचा गजर म्हणजे निर्भयतेचा ध्वजच उभारला. त्यांच्या ओव्यांमध्ये आत्मशुद्धीचा साक्षात्कार घडतो आणि वारी ही केवळ पंढरीची वाटच राहत नाही, तर अनादी परमात्म्याचा शोध देखील बनते. आता पहा ना पुंडलिकाच्या कृतीमधून एक नवा सत्याचा प्रकाश पडतो आणि सेवा म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच ईश्वराचा साक्षात्कार हा त्यांच्या विनयातून गवसतो, मग समर्पणाचे परम तत्त्व देखील त्यातूनच जाताच्या समोर येते कारण जिथे परमात्म्याचा स्वीकार मनापासून केलेला असतो.

वारी ही चालणाऱ्या पावलांची नव्हे, तर मनाच्या निवेदनाची वाट आहे. ही वाट श्रद्धेच्या दीपातून उजळते आणि भक्तीच्या लयीत विलीन होते. यात माणूस केवळ देह नसतो, तर एक सजीव मंत्र बनतो जो संतांच्या ओवीतून अनंतात विलीन होतो. म्हणूनच तर वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक कडवट अनुभवाला गोड करण्याचा एक मार्ग. हे नुसते मूक पायपीट करणारे शरीर नव्हे, तर विचारांच्या गूढतेत हरवलेली माणसं. आणि पंढरीच्या वाटेवरील प्रत्येक पाऊल हा एक आत्मशोध, ज्यात संपूर्ण सृष्टीचा स्पर्श जाणवतो. अखेरीस इतकच म्हणेन की,

धुळीच्या कानांनी ऐकला मंत्र…
पावलांच्या ठेक्यात मिळवला अंतर…
हृदयाच्या स्पंदनांत जागले गूज…
संतवाणीच्या सूरांत गवसला ईश…

:  ऋतुजा केळकर

Leave a Comment