
विशेष प्रतिनिधी :
ठाणे शहरातील रस्त्यांवर आता आकर्षक डबलडेकर बस धावणार असून, पुढील सहा महिन्यांत त्या ठाणे महापालिका परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ठाणे परिवहन उपक्रमाच्या नव्या अर्थसंकल्पात ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई प्रमाणेच ठाणेकरांनाही उंचावरून शहर पाहत प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
या बस कोणत्या मार्गांवर धावणार याबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी घोडबंदर ते ठाणे पूर्व रेल्वे स्थानक हा मार्ग प्राधान्याने विचारात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७९९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या निकषांनुसार शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या शहरात ४६७ बसगाड्या असून, आवश्यक संख्या १३५० इतकी आहे.
ही तफावत भरून काढण्यासाठी प्रशासनाने मोठी खरेदी मोहीम आखली आहे. पीएम ई-बस योजना, १५व्या वित्त आयोग आणि अन्य माध्यमांतून एकूण ३७० नवीन बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. यामध्ये वातानुकूलित इलेक्ट्रिक बस, सीएनजी बस आणि विशेष म्हणजे १० डबलडेकर बसांचा समावेश आहे.
या डबलडेकर बस खरेदीस नुकतीच मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांत या बस प्रत्यक्ष सेवेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे ठाण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला केवळ बळच मिळणार नाही, तर शहराच्या प्रतिमेतही एक वेगळी भर पडणार आहे.